Join us  

साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा

India vs South Africa 1st ODI Live Update : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 5:44 PM

Open in App

India vs South Africa 1st ODI Live Update : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. अर्शदीप सिंग व आवेश खान या भारतीय जलदगती गोलंदाजांनी आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्यानंतर पदार्पणवीर साई सुदर्शन व श्रेयस अय्यर यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून विजय पक्का केला.

Records : अर्शदीप सिंगने इतिहास रचला, १९९३ नंतर भारताच्या जलदगती गोलंदजांचा करिष्मा

भारताच्या जलदगती गोलंदाजांनी आज कमाल केली. अर्शदीप सिंग ( ५-३७) व आवेश खान ( ४-२७) यांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिका भेदरले. त्यांचा संपूर्ण संघ २७.३ षटकांत ११६ धावांत तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ ११६ धावांवर ऑल आऊट झाला आणि घरच्या मैदानावरील वन डे क्रिकेटमधील ही त्यांची निचांक कामगिरी ठरली. २०१८ मध्ये सेंच्युरियन येथे भारताविरुद्धच ते ११८ धावांवर ऑल आऊट झाले होते. अँडिले फेहलुकवायो ( ३३) आणि टॉनी डे झॉर्जी ( २८) यांनी चांगला खेळ केला. अर्शदीपने १० षटकांत ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने शेवटची विकेट घेऊन आफ्रिकेचा डाव २७.३ षटकांत ११६ धावांवर गुंडाळला. आवेशने २७ धावांत ४ विकेट्स घेतल्या.  

प्रत्युत्तरात भारतालाही ऋतुराज गायकवाडच्या ( ५) रुपाने चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ४०० वा खेळाडू साई सुदर्शनने संधीचं सोनं केलं. त्याने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरसह भारताला विजय मिळवून दिला. त्याने ४१ चेंडूंत पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. श्रेयसनेही ४४व्या चेंडूवर षटकार खेचून फिफ्टी पूर्ण केली. विजयासाठी ६ धावांची गरज असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( ५२) झेलबाद झाला आणि साईसह त्याची ८८ धावांची भागीदारी संपुष्टात आली. भारताने १६.४ षटकांत २ बाद ११७ धावा करून विजय पक्का केला.  सुदर्शन ४३ चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाअर्शदीप सिंगश्रेयस अय्यर