India vs South Africa 1st ODI Live Update : अर्शदीप सिंग व आवेश खान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर दबदबा राखला. अर्शदीपने पाच विकेट्स घेतल्या आणि आवेश चार विकेट्स घेत आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर गुंडाळला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुकेश कुमारच्या पहिल्याच चेंडूवर रिझा हेंड्रिक्स पायचीत झाला असता, परंतु भारताने DRS नाही घेतला. पण, अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात हेंड्रिक्सला ( ३) माघारी पाठवले. हेंड्रिक्सच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टींवर जाऊन आदळला. अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( ०) पायचीत करून माघारी पाठवले. अर्शदीपने ८व्या षटकात टॉनी डे झॉर्जी ( २८) ची विकेट घेऊन आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. अर्शदीपचा झंझावात येथे थांबला नाही आणि त्याने हेनरिच क्लासेनला ( ६) बाद केले. अर्शदीपच्या धक्क्यानंतर आवेश खान याने हादरवून टाकले.
त्याने कर्णधार एडन मार्करामचा ( १२) त्रिफळा उडवला. डेव्हिड मिलर ( १) व वियान मुल्डर ( ०) या दोघांना आवेशने सलग चेंडूवर माघारी माठवून आफ्रिकेची अवस्था ७ बाद ५८ धावा अशी केली. घरच्या मैदानावर आफ्रिकेने सर्वात कमी धावांत ६ विकेट्स आज गमावल्या. आज आफ्रिकेने ५२ धावांत ६ विकेट्स गमावल्या. यापूर्वी २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोहान्सबर्ग येथे ६६ धावांत ६ विकेट्स गमावले होते. त्यात आवेश खानने चौथी विकेट घेतली. अँडीले फेहलुकवायो आणि पदार्पणवीर नांद्रे बर्गर यांनी ९व्या विकेटसाठी संघर्ष दाखवला.
फेहलुकवायोने ३३ धावांची झुंझार खेळी केली, परंतु अर्शदीपने तक्याची विकेट मिळवली. अर्शदीपने प्रथमच डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अर्शदीपने १० षटकांत ३७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने शेवटची विकेट घेऊन आफ्रिकेचा डाव २७.३ षटकांत ११६ धावांवर गुंडाळला. आवेशने २७ धावांत ४ विकेट्स घेतल्या.