भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : खेळाडूसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने तर तब्बल 20 महिन्यांनंतर भारतीय संघात पुमनरागमन केले. पण पुनरागमन करताना साहाने संघाच्या निर्णयानुसार सर्वात जलद फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.
हा सामना गाजवला तो भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी. रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी दुसऱ्या दिवशी धडाकेबाज फलंदाजी केली. रोहितचे द्विशतक हुकले असले तरी मयांकने मात्र द्विशतक झळकावले. पण तरीही या सामन्यात सर्वात जलद खेळी साकारल्याचा मान 20 महिन्यांनंतर संघात परतलेल्या साहाला मिळाला.
साहा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघाला कमी चेंडूंमध्ये जास्त धावा करायच्या होत्या. संघाच्या रणनितीनुसार साहाने यावेळी फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. साहाने 16 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. यावेळी भारतीय फलंदाजांचा स्ट्राइक रेट पाहिला तर त्यामध्ये साहाच अव्वल असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या दिवशी भारताचा डबल धमाका; आफ्रिका संकटातभारताकडून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डबल धमाका पाहायला मिळाला. भारताचा सलामीवीर मयांक अगरवालकडून आज द्विशतक पाहायला मिळाले आणि दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 39 अशी मजल मारता आली.
रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. बिनबाद 202 धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. चेतेश्वर पुजारा ( 6), कर्णधार विराट कोहली ( 20) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 15) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळात तीनशे धावा जोडल्या.
मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. कसोटीतील पहिले शतक आणि त्याचे द्विशतकात रुपांतर करून मयांकने विक्रमी कामगिरी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागनं आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती.