Join us  

India vs South Africa 1st Test: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह ओव्हर अर्धवट सोडून गेला मैदानाबाहेर; BCCIने केलं ट्वीट

ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या चेहऱ्यावर असह्य वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 5:59 PM

Open in App

India vs South Africa 1st Test Day 3 Live: भारतीय संघ पहिल्या डावात ३२७ धावांत आटोपला. केएल राहुलचे शतक (१२३) आणि मयंक अग्रवालचे अर्धशतक (६०) याच्या जोरावर भारतीय संघाने त्रिशतकी मजल मारली. पहिल्या दिवशी भारतीय संघ ३ बाद २७२ धावांवर होता. पण तिसऱ्या दिवशीच्या खेळात ५५ धावांत सात गडी बाद झाल्याने भारताचा डाव संपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या डावाची सुरूवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कर्णधार डीन एल्गरला बाद केले. पण नंतर गोलंदाजी करताना बुमराहचा पाय मुरगळला आणि वेदना असह्य झाल्याने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला मैदानाबाहेर जावे लागले.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. सहाव्या षटकातील पाचवा चेंडू टाकताना बुमराहचा पाय मुरगळला. वेदना असह्य झाल्याने जसप्रीत बुमराह थेट मैदानाबाहेर गेला. आपलं षटक त्याला पूर्ण करता आले नाही. तो ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि वेदना असह्य होत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरच दिसून आले. बुमराह मैदानातून बाहेर गेल्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरला मैदानात फिल्डींगला उतरावं लागलं. बीसीसीआयने याबद्दल माहिती दिली. बुमराहच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो मैदानातून बाहेर गेला असून संघाचे वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती BCCI ने ट्वीट करून दिली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार डीन एल्गरने एक धाव काढल्यानंतर पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवरवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर मार्क्रमची साथ द्यायला आलेला पीटरसन संयमी खेळ करत होता. उपहाराची विश्रांती होईपर्यंत त्याने कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. ऋषभ पंत सातत्याने स्टंपमागून काही ना काही बोलून त्याला फटके मारण्यासाठी प्रवृत्त करत होता. पण त्याने संयम बाळगत फलंदाजी केली. दुसरे सत्र सुरू होताच मोहम्मद शमीने एडन मार्क्रम (१३) आणि पीटरसनचा (१५) त्रिफळा उडवला. पाठोपाठ सिराजने वॅन डर डसेनला (३) झेलबाद केले. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ४ बाद ३२ अशी झाली. त्यानंतर, टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक जोडीने डाव सावरला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजसप्रित बुमराहलोकेश राहुलमोहम्मद शामी
Open in App