भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं कारकिर्दीच्या पाचव्या कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. कसोटीतील पहिले शतक आणि त्याचे द्विशतकात रुपांतर करून मयांकने विक्रमी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागनं आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या.
कसोटीत पहिलेच शतक झळकावून सर्वाधिक धावांच्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमात मयांकने दीलीप सरदेसाई यांच्या विक्रमालाही मागे टाकले. सरदेसाई यांनी 1964/65 साली न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत नाबाद 200 धावा केल्या होत्या. मयांकने हा पल्ला ओलांडला. आता त्याला विनोद कांबळीचा ( 224 वि. इंग्लंड, 1992-93) विक्रम खुणावत आहे. या विक्रमात करूण नायर नाबाद 303 ( वि. इंग्लंड, 2016-17) आघाडीवर आहे. शिवाय आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीरानं केलेही ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यात वीरेंद्र सेहवाग ( 319 धावा, चेन्नई 2008) अव्वल स्थानावर आहे.
सामन्यानंतर मयांक म्हणाला की, " मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. कारण द्विशतक झळकावणे सोपे नसते. या खेळीदरम्यान बरेच चढ-उतार आले. काही वेळा संयम बाळगावा लागला तर काही वेळा आक्रमकही व्हावे लागले. हे माझे पहिलेच शतक होते आणि त्याचे मी द्विशतकामध्ये रुपांतर करू शकलो, याचा मला आनंद आहे."
सामन्यानंतर मयांक रोहितबद्दल म्हणाला की, " रोहित आणि मी ज्यापद्धतीने फलंदाजी केली ते पाहता प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडाली होती. काल पाऊस पडला होता आणि त्यानंतर खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. पण यावेळी रोहितने फिरकीपटूंवर जो हल्ला चढवला, ते पाहून डोळ्याचे पारणे फिटले."
मयांकच्या या खेळीचे सर्व स्तरातून कौतुक झाले. त्यात बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सैयामी खेरचाही समावेश आहे. सैयामी नेहमीच क्रिकेट फॉलो करते. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यावर तिचे लक्ष असते आणि सोशल मीडियावरील तिच्या ट्विटमधून ते दिसूनही येते. मयांकने झळकावलेल्या द्विशतकानंतर सैयानीनं ट्विट केलं. ती म्हणाली,''अथक परिश्रमातून मयांकचा इथवरचा प्रवास घडला आहे. निवड समितीनं राष्ट्रीय संघात संधी द्यावी यासाठी तो स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा करत राहिला. अखेरीस त्याची दखल घ्यावी लागली. त्याचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.''