सेंच्युरियन - मुळधार पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला होता. दरम्यान, आता तिसऱ्या दिवसाच्या खेळाबाबत सेंच्युरियनमधून मोठी अपडेट आली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सेंच्युरियनमध्ये सूर्यप्रकाश पडला असून, तिसऱ्या दिवशी एकूण ९८ षटकांचा खेळ होणार असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली आहे.
बीसीसीआयने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तिसऱ्या दिवशी सेंच्युरियनमध्ये आकाश निरभ्र असून, लख्ख सूर्यप्रकाश पडला आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी एकूण ९८ षटकांचा खेळ होणार आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० ते १२ यावेळेत पहिले सत्र, १२.४० ते ३.१० पर्यंत दुसरे सत्र आणि ३.३० ते ५.३० या काळात तिसऱ्या सत्राचा खेळ होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपाहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नव्हता. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता पंच मैदानाची पाहणी करणार होते. मात्र त्यापूर्वीच पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने एकही चेंडूचा खेळ न होता पांचांनी उपाहाराची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर अधिकच वाढल्याने संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करावा लागला होता.
दरम्यान, पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी संघाला शतकी सलामी दिली. दरम्यान, लोकेश राहुलचे शतक, मयांक अग्रवालचे अर्धशतक आणि विराट कोहली व अजिंक्य रहाणेच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने दिवस अखेर ३ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली होती.