Join us  

India vs South Africa 1st test: दक्षिण आफ्रिकेची खराब सुरूवात; बुमराह, शमी अन् सिराजची दमदार गोलंदाजी

भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 3:56 PM

Open in App

India vs South Africa 1st test Day 3 Live Updates Lunch Break : भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी उपहाराच्या विश्रांतीपर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात २१ धावा केल्या. पहिल्या दिवशी भक्कम स्थितीत असणाऱ्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी पहिल्या दीड तासात ५५ धावांमध्ये सात गडी गमावत निराशा केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आफ्रिकन कर्णधाराला जसप्रीत बुमराहने पहिल्या षटकात माघारी धाडले. पण त्यानंतर लंच टाईम होईपर्यंत सलामीवीर एडन मार्क्रम (९*) आणि कीगन पीटरस (११*) यांनी मैदान सांभाळलं. पण दुसऱ्या सत्रात आफ्रिकन फलंदाजीची पडझड दिसून आली.

भारताचा डाव संपताच दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर खेळण्यास आले. कर्णधार डीन एल्गरने एक धावा काढल्यानंतर पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले. ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. त्यानंतर मार्क्रमची साथ द्यायला आलेला पीटरसन संयमी खेळ करत होता. उपहाराची विश्रांती होईपर्यंत त्याने कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. ऋषभ पंत सातत्याने स्टंपमागून काही ना काही बोलून त्याला फटके मारण्यासाठी प्रवृत्त करत होता. पण त्याने संयम बाळगत फलंदाजी केली. दुसरे सत्र सुरू होताच मोहम्मद शमीने एडन मार्क्रम (१३) आणि पीटरसनचा (१५) त्रिफळा उडवला. पाठोपाठ सिराजने वॅन डर डसेनला (३) झेलबाद केले.

त्याआधी, पहिल्या दिवशी सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी शतकी सलामी दिली. मयंक अर्धशतक ठोकून ६० धावांवर बाद झाला. पण राहुलने दमदार शतक ठोकलं. आधी विराट कोहली (३५) आणि नंतर अजिंक्य रहाणेच्या साथीने त्याने खेळी सजवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच आधी लोकेश राहुल १२३ धावांवर तर पाठोपाठ अजिंक्य रहाणे ४८ धावांवर माघारी गेला. या प्रकारानंतर भारताच्या डावाला गळतीच लागली. ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. बुमराहने १४ धावा केल्या. पण अखेर भारताचा डाव ३२७ धावांवर संपला.

लुंगी एन्गी़डीने अप्रतिम गोलंदाजी करत ६ बळी टिपले. सेंच्युरियनच्या मैदानावर आज एक योगायोग घडला. लुंगी एन्गीडीने कसोटी कारकिर्दीत या आधी केवळ एकदाच एका डावात सहा बळी घेतले होते. योगायोगाने ते सहा बळी सेंच्युरियनच्या मैदानावर आणि भारतीय संघाविरूद्धच घेतले होते. २०१८ नंतर त्याने आज पुन्हा एकदा तशीच कामगिरी करून दाखवली.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलरिषभ पंतजसप्रित बुमराह
Open in App