IND vs SA Lungi Ngidi 6 Wickets Haul: भारतीय संघाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. लोकेश राहुलचे शतक (१२३), मयंक अग्रवालचे अर्धशतक (६०) आणि अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी (४८) यांच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. या डावात भारताच्या डावाला सुरूंग लावण्यात मोठा वाटा होता तो दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गीडीचा. त्याने सहा बळी टिपले. त्याच्याबाबतीत एक योगायोग घडून आला.
एन्गीडीच्या एका चांगल्या कामगिरीत दोन योगायोग
लुंगी एन्गीडीने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत आजच्या सामन्यात केवळ दुसऱ्यांदा एका डावाच सहा बळी टिपले. त्याने मयंक, पुजारा, कोहली, रहाणे, पंत आणि शमी यांना बाद केले. ७१ धावा देत त्याने हे सहा गडी बाद केले. योगायोगाची गोष्ट अशी की एन्गीडीने याआधीदेखील भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यातच एका डावात सहा बळी टिपले होते. २०१८ साली जेव्हा भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर आला तेव्हा त्याने ही कामगिरी केली होती. त्याने केवळ ३९ धावांमध्ये सहा बळी टिपले होते. या बाबतीत दुसरा योगायोग म्हणजे त्याने ते सहा बळीदेखील सेंच्युरियनच्या मैदानातच घेतले होते.
असा रंगला भारताचा पहिला डाव
सामन्याच्या पहिल्या दिवशी सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी शतकी सलामी दिली. मयंक अग्रवाल अर्धशतकानंतर (६०) बाद झाला. राहुलने मात्र शतक ठोकलं. आधी विराट (३५) आणि नंतर रहाणेच्या साथीने राहुल खेळत राहिला. दुसरा दिवस पावसाने वाया गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच आधी लोकेश राहुल १२३ धावांवर तर पाठोपाठ अजिंक्य रहाणे ४८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. बुमराहने १४ धावा केल्या. पण भारताला ३२७ धावांपर्यंतच मजल मारता आली.