IND vs SA 1st Test Day 3 Live: भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवसअखेर ३ बाद २७२ धावांची भक्कम सुरूवात केल्यानंतर दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. पण तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाजांना आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज लुंगी एन्गीडी आणि कगिसो रबाडा यांनी नाचवलं. अवघ्या ५५ धावांत सात गडी बाद करत त्यांनी भारताचा डाव पहिल्या दीड तासांतच संपवला. राहुलचं शतक, मयंकचं अर्धशतक अन् अजिंक्य रहाणेची ४८ धावांची झुंजार खेळी यामुळे भारताला त्रिशतकी मजल मारता आली. लुंगी एन्गीडीने ६, रबाडाने ३ तर जेन्सनने १ गडी बाद केला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ ३ बाद २७२ धावांवरून सुरू झाला. त्यानंतर आधी लोकेश राहुल केवळ एका धावेची भर टाकून बाद झाला. त्याने २६० चेंडूत १२३ धावा केल्या. अजिंक्य रहाणे अर्धशतक करणार असं वाटत असतानाच तोदेखील ४८ धावा करून माघारी परतला. रहाणेच्या विकेटनंतर धडाधड विकेट्स गेल्या. पहिल्या सत्राच्या पहिल्या तासाभरातच ऋषभ पंत ८ धावांवर, रविचंद्रन अश्विन ४ धावांवर तर शार्दूल ठाकून ४ धावांवर बाद झाला.
तळाच्या फलंदाजांपैकी शमीने २ चौकारांसह ८ धावा आणि जसप्रीत बुमराहने २ चौकारांसह १४ धावा केल्या. त्यामुळे भारताने कशीबशी ३२७ धावांपर्यंत मजल मारली. लुंगी एन्गीडीने सर्वोत्तम कामगिरी करत ७१ धावांत ६ गडी बाद केले. कगिसो रबाडालाही ७२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी मिळाले. तर नवख्या जेन्सनने बुमराहला बाद करून भारताचा डाव संपवला.