भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या 400 पार धावा चोपल्या. बिनबाद 202 धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. चेतेश्वर पुजारा ( 6), कर्णधार विराट कोहली ( 20) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 15) यांना मोठी खेळी करता आली नाही. पण, तुम्हाला माहितीय का कोणत्या संघातील सलामीवीरांच्या नावावर सर्वाधिक द्विशतकं आहेत?
भारतीय सलामीवीरानं कसोटीत द्विशतक झळकावण्याची ही पाचवी वेळ आहे. मयांकने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 215 धावा केल्या आहेत. त्यापूर्वी वीरेंद्र सेहवागने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 293, गौतम गंभीरने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 206, सेहवागने 2008मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 201 आणि सेहवागने 2008मध्ये आफ्रिकेविरुद्ध 319 धावा केल्या आहेत. सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या सलामीवीरांत भारतीय संघाने इंग्लंडशी बरोबरी केली आहे. भारताच्या सलामीवीरांनी कसोटीत 19वेळा द्विशतकी खेळी केली आहे. त्यांनी इंग्लंडशी बरोबरी केली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज ( 14), दक्षिण आफ्रिका ( 14), पाकिस्तान व श्रीलंका ( प्रत्येकी 10), न्यूझीलंड ( 8), झिम्बाब्वे व बांगलादेश ( प्रत्येकी 1) यांचा क्रमांक येतो. या विक्रमात ऑस्ट्रेलिया 20 द्विशतकांसह अव्वल स्थानावर आहे.
मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं पाचव्या कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. कसोटीतील पहिले शतक आणि त्याचे द्विशतकात रुपांतर करून मयांकने विक्रमी कामगिरी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागनं आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती.
कसोटीत पहिलेच शतक झळकावून सर्वाधिक धावांच्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमात मयांकने दीलीप सरदेसाई यांच्या विक्रमालाही मागे टाकले. सरदेसाई यांनी 1964/65 साली न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत नाबाद 200 धावा केल्या होत्या. मयांकने हा पल्ला ओलांडला. आता त्याला विनोद कांबळीचा ( 224 वि. इंग्लंड, 1992-93) विक्रम खुणावत आहे. या विक्रमात करूण नायर नाबाद 303 ( वि. इंग्लंड, 2016-17) आघाडीवर आहे.