भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताकडून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी डबल धमाका पाहायला मिळाला. भारताचा सलामीवीर मयांक अगरवालकडून आज द्विशतक पाहायला मिळाले आणि दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 39 अशी मजल मारता आली. यावेळी भारताला दोन बळी मिळवून दिले ते फिरकीपटू आर. अश्विनने. सध्याच्या घडीला भाराताकडे 463 धावांची आघाडी आहे.
रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. बिनबाद 202 धावांवरून आजचा खेळ सुरू करताच रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. चेतेश्वर पुजारा ( 6), कर्णधार विराट कोहली ( 20) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 15) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळात तीनशे धावा जोडल्या.
मयांकचे द्विशतक; वीरूशी बरोबरी अन् मोडला 54 वर्षांपूर्वीचा विक्रम रोहित शर्माच्या झंझावातानंतर मयांक अग्रवालची बॅट तळपली. त्यानं कसोटीत दमदार द्विशतकी खेळी केली. कसोटीतील पहिले शतक आणि त्याचे द्विशतकात रुपांतर करून मयांकने विक्रमी कामगिरी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावणारा तो दुसरा आशियाई सलामीवीर ठरला आहे. वीरेंद्र सेहवागनं आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी केली होती.
रोहितची फलंदाजी सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही 'भारी', पाहा ही आकडेवारीहिटमॅन रोहित शर्मानं प्रथमच कसोटीत सलामीला येताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. पण, त्याची ही यशस्वी घोडदौड 176 धावांवर संपुष्टात आली. त्यानं 170 पेक्षा अधिक धावा करताना वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आणि याची नोंद करून त्यानं ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांचाही विक्रम मोडला.
रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 72.13च्या स्ट्राईक रेटनं 176 धावा केल्या. यासह घरच्या मैदानावर कसोटीत 100च्या सरासरीनं धावा करण्याचा मान त्यानं पटकावला. किमान दहा डावांत सर्वाधिक सरासरीनं धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. या विक्रमात त्यानं ब्रॅडमन यांना मागे टाकले. ब्रॅडमन यांनी 50 डावांत 4322 धावा केल्या आहेत आणि त्यांची सरासरी 98.22 इतकी आहे. आजच्या खेळीनं रोहितला ब्रॅडमन यांच्यापेक्षा भारी बनवलं आहे. घरच्या मैदानावर रोहितची कसोटीतील सरासरी 100.07* इतकी झाली आहे.