भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय वंशाच्या एका खेळाडूने चक्क आज आपल्या देशाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूचे मूळ हे भारतातील चेन्नई आहे. चेन्नई येथील नागापत्तनम या गावी अजूनही त्याच्या कुटुंबियातील काही व्यक्ती राहत आहेत. या कुटुंबियांच्या काही पिढ्या दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी या खेळाडूचे कुटुंबिय दक्षिण आफ्रिकेमधील दरबान येथे वास्तव्याला गेले होते. त्यानंतर हे कुटुंबिय अजूनही तिथेच राहते. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या अ संघामधून त्याने भारताचा दौराही केली होता. आता हा खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सेनुरान मुथुस्वामी. आज सेनुरान मुथुस्वामीने पाच षटके टाकली होती.
सेनुरान मुथुस्वामीने आज दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले. याबाबत तो म्हणाला की, " जेव्हा माझ्या आई-बाबांना पदार्पणाबाबत सांगितले तेव्हा ते फार आनंदी झाले. मी दरबान येथे राहतो. दरबान येथे मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात. मी नियमित मंदीरामध्ये जातो, त्याचबरोबर आम्ही घरातही तमिळ भाषेतच संवाद साधतो. पण मी हळूहळू बोलायला शिकत आहे."मुथुस्वामी ने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3403 धावा केल्या आहेत, त्याचबरोबर 129 विकेट्सही मिळवल्या आहेत.