IND vs SA Test Series: भारतीय संघ रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माने मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी आज उपकर्णधार लोकेश राहुलने एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने पहिल्या कसोटीसाठी संघ नक्की कसा असेल? टीम इंडिया किती गोलंदाजांसह मैदानात उतरेल? याबाबत संकेत दिले.
"मला असं वाटतं की अशा खेळपट्ट्यांवर साधारणपणे सर्व संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरतात. कारण सर्वच संघांना प्रतिस्पर्धी संघाच्या २० विकेट्स बाद करायच्या असतात. कसोटी सामना जिंकायचा असेल तर यापेक्षा चांगला मार्ग कोणताच नसतो. आधीच्या काही दौऱ्यांवर आम्ही अशी योजना आखली होती आणि त्याचा संघाला फायदा झाला होता. परदेशात आम्ही जेव्हा जेव्हा पाच गोलंदाजांसह मैदानात उतरलो तेव्हा त्याचा संघाला फायदा झाला. कारण पाच गोलंदाज संघात असले एखाद्या विशिष्ट गोलंदाजावर ताण येत नाही. तुम्हाला गोलंदाजीमध्ये बदल करण्याची संधी मिळते. तसेच, प्रतिभावान गोलंदाजांची फळी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्यांना योग्यवेळी वापरता येते", असं राहुल पत्रकार परिषदेत म्हणाला.
जर राहुलच्या वक्तव्याप्रमाणे भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला तर रविचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूर या दोघांनाही संघात नक्कीच स्थान मिळेल. कारण शार्दूल आणि अश्विन दोघांनीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अष्टपैलू कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे या दोन अष्टपैलू खेळाडूंमुळे संघाला संतुलित खेळ खेळता येईल असं जाणकारांचं मत आहे.