India Vs South Africa 1st Test | सेंच्युरियन : पहिल्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माला (५) काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात रोहित चमकदार कामगिरी करून सामन्यात संघाचे पुनरागमन करेल अशी आशा भारतीय चाहत्यांना होती. मात्र, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील भारतीय कर्णधार स्वस्तात बाद झाला. कगिसो रबाडा रोहितसाठी काळ ठरला अन् त्याने अप्रतिम चेंडू टाकून हिटमॅनचा त्रिफळा काढला. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. १६३ च्या मजबूत आघाडीसह दक्षिण आफ्रिकेने सामन्यात पकड बनवली आहे.
दरम्यान, रोहितपाठोपाठ यशस्वी जैस्वाल देखील बाद झाला असून भारताला सुरूवातीलाच दोन मोठे धक्के बसले. रोहितला खातेही उघडता आले नाही, तो पाच चेंडू खेळून तंबूत परतला. तर यशस्वी जैस्वाल १८ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. तिसर्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेला ४०८ धावांत गुंडाळले आणि यासह यजमानांनी भारतावर १६३ धावांची आघाडी घेतली. आफ्रिकेकडून डीन एल्गारने सर्वाधिक १८५ धावा केल्या तर मार्को जान्सनने ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर मोहम्मद सिराजने (२) बळी घेऊन भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
...अन् रोहितही शॉक
दरम्यान, दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ६६ षटकांत ५ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाकडे ११ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आज यजमान संघाने स्फोटक खेळी करत ४०० पार धावसंख्या नेली. आफ्रिकेने १०८.४ षटकांत सर्वबाद ४०८ धावा केल्या आणि यासह यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांवर संपला. टीम इंडियाकडून लोकेश राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी खेळली. तर, दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ बळी घेतले.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.