Join us  

IND vs SA Live: "बरं झालं आम्ही टॉस हरलो", कर्णधार रोहित शर्मा असं का म्हणाला? जाणून घ्या

India Vs South Africa 1st Test Live Updates In Marathi : आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 2:31 PM

Open in App

India Vs South Africa 1st Test Live Updates | सेंच्युरियन: लाजिरवाणा विक्रम मोडण्याच्या इराद्याने आजपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर भारतीय संघ कमजोर दिसला. अद्याप भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. भारताने ३२ वर्षात आठवेळा आफ्रिकेचा दौरा केला असून एकदाही टीम इंडियाला मालिका खिशात घालता आली नाही. पहिल्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून टीम इंडियाला रोहित शर्माच्या रूपात सुरूवातीलाच मोठा झटका बसला. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेला रोहित बाद झाला. 

दरम्यान, भारताने नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आनंद व्यक्त केला. याशिवाय नाणेफेक गमावली ते चांगलंच झालं असल्याचं त्यानं म्हटलं. "आम्ही नाणेफेक गमावली हे चांगलं झालं... कारण मला या खेळपट्टीवर आधी काय चांगले होईल याची खात्री नव्हती. इथे गोलंदाजांना मदत मिळेल की फलंदाजांना याची खात्री नाही. पण, येथील परिस्थितीशी आम्ही परिचित आहोत. खेळपट्टीवर गवत आहे. तसेच ढगाळ वातावरण आहे. गोलंदाजांना मदत मिळेल पण आमचे फलंदाज या परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतील असा मला विश्वास आहे", असे रोहितने नाणेफेकीवेळी सांगितले. 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ