India Vs South Africa 1st Test | सेंच्युरियन : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, मंगळवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताला मोठे झटके बसले. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर गडी बाद होण्याची मालिकाच सुरू झाली. लोकेश राहुल वगळता एकाही भारतीय फलंदाजांला मोठी खेळी करता आली नाही. कगिसो रबाडाने पाच बळी घेत पाहुण्या संघाचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसले. भारताच्या खराब कामगिरीनंतर भारतीय दिग्गज सुनिल गावस्कर यांना मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची कमी जाणवली. अशा खेळपट्टीवर रहाणे असता तर टीम इंडियाची परिस्थिती काहीशी वेगळी असती असे त्यांनी म्हटले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात समालोचन करत असलेल्या गावस्करांनी म्हटले, "भारताने पाच वर्षांपूर्वी जोहान्सबर्ग येथे खेळलेल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीवर खूप चर्चा झाली आणि मी देखील तिथे उपस्थित होतो. होय, ती खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. तेव्हा सुरूवातीच्या दोन सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेची संघात निवड झाली नव्हती. दोन्हीही सामने टीम इंडियाने गमावल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की, रहाणेला न खेळवणे ही मोठी चूक झाली. त्यामुळे मला वाटते की, आताच्या घडीला देखील रहाणे इथे असता तर भारताची परिस्थिती काहीशी वेगळी असती. तो एक अप्रतिम फलंदाज असून परदेशी खेळपट्टीवर तो चांगली कामगिरी करत आला आहे. त्यामुळे साहजिकच भारताला त्याची कमी भासत असेल."
आफ्रिकेत भारताची 'कसोटी'
भारतीय संघ मागील काही दिवसांपासून आफ्रिका दौऱ्यावर आहे. ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर कसोटी मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. खरं तर आतापर्यंत भारतीय संघाला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे लाजिरवाणा विक्रम मोडण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघावर आहे. मात्र, सलामीच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी कगिसो रबाडाने भारताच्या आशेवर पाणी टाकले. पहिल्या दिवसअखेर भारताने ८ गडी गमावून २०८ धावा केल्या. भारताने केवळ १२१ धावांत सहा गडी गमावले. लोकेश राहुल ७० धावांवर नाबाद खेळत आहे. तर, शार्दुल ठाकूर (२४), जसप्रीत बुमराह (१), आर अश्विन (८), श्रेयस अय्यर (३१), विराट कोहली (३८), शुबमन गिल (२), रोहित शर्मा (५) आणि यशस्वी जैस्वाल (१७) धावा करून तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर नांद्रे बर्गरला २ आणि मार्को जान्सेनला १ बळी घेण्यात यश आले.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
Web Title: India Vs South Africa 1st Test Live Updates In Marathi legend Sunil Gavaskar has said that if Ajinkya Rahane was in the Indian team, the team would have been in a strong position
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.