IND vs SA 1st Test Day 1 Lunch: भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात एकही गडी बाद होऊ न देता ८३ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकन खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. अशा परिस्थितीत अतिशय संयमाने फलंदाजी करत भारताचे सलामीवीर मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल दोघांनीही संघाला भक्कम सुरूवात करून दिली. उपहाराची विश्रांती होईपर्यंत झालेल्या २८ षटकांच्या खेळात या दोघांनी ८३ धावांची भागीदारी केली. लंच ब्रेकच्या वेळी मयंक नाबाद ४६ तर राहुल २९ धावांवर खेळत होता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात लगेचच मयंकने दमदार अर्धशतक ठोकले. तसेच, संघानेही शतक गाठले.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परदेशात भारतीय फलंदाज खराब कामगिरी करतात असा सूर सामना सुरू होण्याआधीपर्यंत दिसत होता. पण दोन्ही सलामीवीरांनी पहिले सत्र चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध पणे खेळून काढले. पहिल्या १५ मिनिटांच्या खेळातच दक्षिण आफ्रिकेने राहुलच्या फलंदाजीच्या वेळी रिव्ह्यू घेतला होता. पण तो रिव्ह्यू वाया गेला. त्यानंतर या दोघांनी दमदार अर्धशतकी भागीदारी रचली.
भारतीय संघाने अर्धशतक गाठताच पुढच्या चेंडूवर मयंक अग्रवालच्या बॅटला लागून चेंडू यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक कडे गेला. पण मयंकचं नशीब बलवत्तर असल्याने डी कॉक आणि पहिल्या स्लीपमधील डीन एल्गर दोघांच्या हातून तो झेल सुटला. त्यानंतर मात्र पुन्हा पहिल्या सत्रात दोन्ही फलंदाजांनी अतिशय सावधपणे खेळ सुरू ठेवला.