IND vs SA 1st Test Day 3, Shardul Thakur Breaks Partnership: भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. लोकेश राहुलचे शतक आणि मयंक अग्रवालचे अर्धशतक यांच्या खेळीमुळे टीम इंडियाला त्रिशतकी मजल मारणे शक्य झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. कर्णधार डीन एल्गर, पीटनसन, एडन मार्क्रम आणि वॅन डर डुसेन हे त्यांचे पहिले चार फलंदाज अवघ्या ३२ धावांमध्ये माघारी परतले. पण त्यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलेच रडवले. ही जोडी शार्दूल ठाकूरने फोडली.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू 'लॉर्ड' शार्दूल ठाकूर याने इंग्लंड आणि न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकांमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संघात स्थान मिळाले. या सामन्यात त्याला फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. गोलंदाजीतही पहिल्या काही षटकांत त्याला म्हणावी तशी कामगिरी जमली नाही. क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यांची भागीदारी अधिक भक्कम होत होती. त्यामुळे विराट कोहलीने त्यांची जोडी फोडण्याचे काम शार्दूलकडे दिले आणि लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करत शार्दूलने भागीदारी तोडली.
क्विंटन डी क़ॉक चांगली केळी करत असल्याचं दिसल्यावर शार्दूलने बाजू बदलली. त्याने राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि लगेचच 'जोडी ब्रेकर' शार्दूलने डी कॉकला त्रिफळाचीत केले. बाहेरून आत येणारा चेंडू खेळताना डी कॉकची बॅट लागून चेंडू स्टंपवर आदळला आणि त्याची खेळी संपली. त्यामुळे ७२ धावांची भागीदारी अखेर फुटली. शार्दूलने आधीही अनेकदा मोठी भागीदारी फोडण्याचं काम केलं आहे. केवळ टीम इंडियाकडूनच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळतानाही त्याने अनेकदा मोठ्या भागीदारी होत असताना मोक्याच्या क्षणी विकेट्स काढल्या आहेत.