भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीवीर म्हणून एकत्र खेळणाऱ्या जोडीनं शतक झळकावणारी ही तिसरी भारतीय जोडी आहे. 2005-06मध्ये वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड ( वि. पाकिस्तान) आणि 2012-13मध्ये मुरली विजय व शिखर धवन ( वि. ऑस्ट्रेलिया) यांनी प्रथमच कसोटीत एकमेकांसह सलामीला खेळताना द्विशतकी भागीदारी केली होती. याही पलिकडे 2008 नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 200+ धावांची सलामी देणारी पहिलीच जोडी ठरली. 2008मध्ये सेहवाग व वासीम जाफर यांनी चेन्नई कसोटीत 213 धावांची सलामी दिली होती.
रोहितनं 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे.