भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशत झळकावले. या द्विशतकासह मयांकने सध्या धावांची खाण उघडणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथलाही मागे टाकल्याचे पाहायला मिळाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्मिथने धावांची टांकसाळ उघडली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षामध्ये स्मिथने धावांचा रतीब घातला असेही म्हटले गेले. पण मयांकने आजच्या एका द्विशतकी खेळीनंतर त्याने स्मिथला मागे टाकल्याचे दिसत आहे.
या वर्षामध्ये पाच द्विशतके पाहायला मिळाली. मयांकचे हे या वर्षातील पाचवे द्विशतक ठरले. यापूर्वी झळकावलेल्या चार द्विशतकांमध्ये सर्वाधिक धावा या स्मिथच्या नावावर होत्या. स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 211 धावा केल्या होत्या. मयांकने या सामन्यात 215 धावा करत स्मिथला पिछाडीवर टाकले आहे.
द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...रोहित शर्माचे या सामन्यात द्विशतक हुकले. पण या सामन्यात द्विशतक झळकावले ते भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने. सामन्यानंतर जेव्हा मयांकला त्याच्या खेळीबाबत विचारले तेव्हा त्याने रोहितच्या खेळीबद्दल काही वक्तव्य केलं आहे.
सामन्यानंतर मयांक म्हणाला की, " मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. कारण द्विशतक झळकावणे सोपे नसते. या खेळीदरम्यान बरेच चढ-उतार आले. काही वेळा संयम बाळगावा लागला तर काही वेळा आक्रमकही व्हावे लागले. हे माझे पहिलेच शतक होते आणि त्याचे मी द्विशतकामध्ये रुपांतर करू शकलो, याचा मला आनंद आहे."
सामन्यानंतर मयांक रोहितबद्दल म्हणाला की, " रोहित आणि मी ज्यापद्धतीने फलंदाजी केली ते पाहता प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडाली होती. काल पाऊस पडला होता आणि त्यानंतर खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. पण यावेळी रोहितने फिरकीपटूंवर जो हल्ला चढवला, ते पाहून डोळ्याचे पारणे फिटले."