सेंच्युरियन - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उपाहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता पंच मैदानाची पाहणी करणार होते. मात्र त्यापूर्वीच पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने एकही चेंडूचा खेळ न होता पांचांनी उपाहाराची घोषणा केली.
कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व राखल्याने आता दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. मात्र सेंच्युरियनमध्ये पाऊस पडत असल्याच्या वृत्तामुळे त्यांची निराशा झाली. आज सकाळपासूनच सेंच्युरियनमध्ये पाऊस पडत होता. दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टीवरील कव्हर काढून मैदान खेळासाठी तयार करण्यात येत होते. तसेच पंच मैदानाची पाहणी करणार होते. मात्र पंचांनी पाहणी करण्यापूर्वीच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेला.
उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेल्यानंतरही सेंच्युरियनमधील हवामानात फार मोठा बदल झालेला नाही. येथे अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे उपाहारानंतरचाही खेळ मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची शक्यता आहे. आता पाऊस थांबल्यानंतर पंच पुन्हा खेळ सुरू करण्याबाबत पंच काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
दरम्यान, सेंच्युरियन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी संघाला शतकी सलामी दिली. दरम्यान, लोकेश राहुलचे शतक, मयांक अग्रवालचे अर्धशतक आणि विराट कोहली व अजिंक्य रहाणेच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने दिवस अखेर ३ बाद २७२ धावांपर्यंत मजल मारली होती.