भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : निराशाजनक सुरुवातीनंर आफ्रिकन संघाने तिसऱ्या दिवशी दमदार कमबॅक केले. डीन एल्गनरची शतकी खेळी आणि त्याला कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस आणि क्विंटन डी कॉक यांच्या अर्धशतकी खेळीची मिळालेली साथ, याच्या जोरावर आफ्रिकेनं पहिल्या कसोटीवरील टीम इंडियाची पकड सैल केली. एल्गरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानं दीडशतकी खेळी करताना आफ्रिकेला फॉल ऑन पासून वाचवले. त्याला रवींद्र जडेजानं माघारी पाठवले. या विकेटसह जडेजानं विक्रमाला गवसणी घातली.
रोहित शर्माच्या दिडशतकी खेळीनंतर मयांक अग्रवालने केलेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने खोऱ्यानं धावा चोपल्या. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 2/9) आणि रवींद्र जडेजा ( 1/21) यांनी आफ्रिकेला धक्का देत त्यांची अवस्था 3 बाद 39 अशी केली.
तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इशांत शर्मानं आफ्रिकेला धक्का दिला. त्यानं टेंबा बवूमाला पायचीत केले. त्यानंतर फॅफ आणि एल्गर यांनी चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. अश्विनने फॅफला माघारी पाठवले, पण क्विंटनने एल्गरसोबत खिंड लढवली. फॅफने 103 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 55 धावा केल्या. क्विंटन आणि एल्गर या जोडीनं सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांची 164 धावांची भागीदारी रवींद्र जडेजानं संपुष्टात आणली. एल्गरने 287 चेंडूंत 18 चौकार व 4 षटकारांसह 160 धावा केल्या. जडेजानं ही विकेट घेत एक विक्रम नावावर केला.
जडेजानं 44 कसोटीत हा पल्ला पार केला. सर्वात जलद 200 विकेट घेणारा जडेजा हा डावखुरा गोलंदाज ठरला. त्यानं श्रीलंकेच्या रंगना हेरथचा ( 47) विक्रम मोडला.