भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित शर्मा -मयांक अग्रवाल जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसल्या. पण, रोहित व मयांकची ही 21 धावांची भागीदारी विक्रमी ठरली आणि त्यांनी 41 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
पहिल्या डावात रोहितच्या दिडशतकी खेळीनंतर मयांकने केलेल्या विक्रमी द्विशतक झळकावलं. पहिल्या दिवसाच्या बिनबाद 202 धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळात रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला.
डीन एल्गर ( 160), फॅफ ड्यू प्लेसिस ( 55) आणि क्विंटन डी कॉक ( 111) यांच्या फटकेबाजीनं आफ्रिकेचा फॉलो ऑन टाळला. सेनूरान मुथूसामीनं नाबाद 33 धावांची खेळी करताना संघाला 431 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. पण, दुसऱ्या डावात 21 धावांवर भारताला पहिला धक्का बसला आणि लंचपर्यंत भारताने एक बाद 35 धावा केल्या.
या सामन्यात रोहित व मयांक या जोडीनं मिळून संघाच्या धावसंख्येत 423+ धावांचा वाटा उचलला आहे. एका सामन्यात भारताच्या एकूण धावसंख्येत सलामीवीरांनी उचललेला हा सर्वात मोठा वाटा आहे. यापूर्वी 1978मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय सलामीवीरांनी 414 धावांचा वाटा उचलला होता. 1956मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत एकाच डावात भारतीय सलामीवीरांनी 404 धावा चोपल्या होत्या.