भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत.
रोहित आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कसोटीत आतापर्यंत 3 ते 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित प्रथमच सलामीला आला. त्यानं त्याचे दडपण न घेता दमदार खेळ केला. रोहितनं अर्धशतकी भागीदारी करून कसोटीही आपण सलामीवीर म्हणून हिट आहोत हे दाखवून दिलं. रोहितनं या कसोटीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. मयांकसह त्यानं ऐतिहासिक खेळी केली.
यासह मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या फलंदाजांत रोहितनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं मायदेशात 94च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानंतर विजय हजारे ( 69.56), विराट कोहली ( 64.68), चेतेश्वर पुजारा ( 61.86) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 55.93) यांचा क्रमांक येतो. रोहितनं मायदेशात 15 डावांत 821+ धावा केल्या आहेत. त्यात नऊवेळा 50+ धावा केल्या आहेत. परदेशात त्यानं 33 डावांत 23.32 च्या सरासरीनं 816 धावा केल्या आहेत.