भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात सर्वांचे लक्ष्य लागले आहे ते हिटमॅन रोहित शर्मावर... मर्यादित षटकांच्या सामन्यांत यशस्वी सलामीवीर म्हणून आघाडीवर असलेला रोहित प्रथमच कसोटीत ओपनिंग करणार आहे. लोकेश राहुलच्या अपयशामुळे रोहितला ही संधी मिळाली आहे. याआधी रोहितनं कसोटीत कधीच ओपनिंग केली नाही, त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याच्यावर प्रचंड दडपण असणार आहे. पण, कर्णधार विराट कोहलीनं सामन्यापूर्वी हिटमॅनला सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात अध्यक्षीय एकादश संघाचे नेतृत्व सांभाळताना रोहित सलामीला आला होता. पण, अवघ्या दोन चेंडूंचा सामना करून रोहित भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे त्याची फलंदाजी कसोटीत सलामीसाठी उपयुक्त नाही, असे मत व्यक्त केले गेले. मर्यादित षटकांच्या सामन्यातील आक्रमकपणा कसोटीत कामी येणार नाही, असा सल्लाही अनेकांनी लगोलग त्याला देऊन टाकला.
रोहित शर्माने आधीही टेस्टमध्ये केलीय 'ओपनिंग'! रोहितनं आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. 2008-09 च्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रविरुद्ध रोहितनं 40 चेंडूंत नाबाद 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2010-11च्या रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 73 चेंडूंत 68 धावा केल्या होत्या. 2012-13च्या रणजी स्पर्धेतही पंजाबविरुद्ध त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्यानं 11 चेंडूंत 28 धावा केल्या होत्या. पण, या तीनही सामन्यांत अखेरच्या दिवशी रोहितला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती.