भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहित शर्माचा खेळ कसा होतो, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. रोहितनं सुरुवातीला संयमी आणि जम बसल्यावर आपल्या नेहमीच्या अंदाजात खेळ करताना चाहत्यांना खुश केलं. हिटमॅन रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सॉलिड सुरुवात करताना दी वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1998मध्ये द्रविडनं केलेल्या विक्रमाची रोहितनं पुनरावृत्ती केली. असा कोणता विक्रम, चला जाणून घेऊया...
रोहित आणि मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कसोटीत आतापर्यंत 3 ते 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित प्रथमच सलामीला आला. त्यानं त्याचे दडपण न घेता दमदार खेळ केला. रोहितनं अर्धशतकी भागीदारी करून कसोटीही आपण सलामीवीर म्हणून हिट आहोत हे दाखवून दिलं.
मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या फलंदाजांत रोहितनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं मायदेशात 91.22च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानंतर विजय हजारे ( 69.56), विराट कोहली ( 64.68), चेतेश्वर पुजारा ( 61.86) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 55.93) यांचा क्रमांक येतो. रोहितनं मायदेशात 15 डावांत 821+ धावा केल्या आहेत. त्यात नऊवेळा 50+ धावा केल्या आहेत. परदेशात त्यानं 33 डावांत 23.32 च्या सरासरीनं 816 धावा केल्या आहेत.
रोहितनं घरच्या मैदानावर कसोटीत सलग सहावेळा 50+ धावा केल्या आहेत. त्यानं मागील सहा डावांत 82, 51*, 102*, 65, 50*, 59*( आजची खेळी) पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. द्रविडनं 1997-98 या कालावधीत मायदेशात सलग सहावेळा 50+ धावा केल्या होत्या.
Web Title: India vs South Africa, 1st Test : Rohit Sharma equal Rahul Dravid record; Consecutive 50+ Test scores at home (Indians)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.