भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. कसोटीत प्रथमच सलामीला आलेल्या रोहितनं खणखणीत शतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली, तर मयांकनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. रोहित आणि मयांक प्रथमच सलामीवीर म्हणून कसोटीत एकत्र खेळले. या जोडीनं 59.1 षटकांत 202 धावांची भागीदारी करून इतिहास घडवला.
अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. रोहितने 174 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकार खेचून 115 धावा केल्या, तर मयांकने 183 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा केल्या आहेत. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.
पण, धवनने या शतकी खेळीत दोन षटकार खेचले होते, तर लोकेशनं एकच षटकार मारला होता आणि पृथ्वी शॉच्या शतकी खेळीत एकही षटकार नव्हता. रोहितनं या सर्वांना मागे टाकताना शतकी खेळीत 4 षटकार लगावले. सलामीवीर म्हणून रोहितनं कसोटीत पहिल्याच सामन्यात शतक झळकावले, शिवाय कसोटी पदार्पणातही त्यानं शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. वीरेंद्र सेहवागलाही हे जमले नाही.