भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रोहित शर्मानं पहिल्या कसोटीचा चौथा दिवस गाजवला... सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय, एका कसोटीत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज, भारतीय खेळपट्टींवर सलग सात अर्धशतकी खेळी करणारा पहिला भारतीय... असे अनेक विक्रम रोहितने आज मोडले. त्याच्या शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या ( 81) अर्धशतकी खेळीनं भारताला दुसऱ्या डावात मजबूत आघाडी मिळवून दिली. त्याच्याच जोरावर भारतीय संघाने आफ्रिकेसमोर तगडे आव्हान ठेवले आहे.
भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसल्या. पण, रोहित व पुजारा यांनी दीडशतकी भागीदारी करताना भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. पुजारा 148 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकार खेचून माघारी परतला. रोहितने 149 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकार खेचून 127 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रवींद्र जडेजानेही 32 चेंडूंत 3 षटकारांसह 40 धावा केल्या.
त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे ट्वेंटी-20 क्रिकेटच्या मूडमध्ये दिसले. रहाणे नाबाद 27 आणि कोहली नाबाद 31 धावांवर असताना भारताने 4 बाद 323 धावांवर डाव घोषित केला. आफ्रिकेसमोर विजयासाठी 395 धावांचे लक्ष्य आहे.