भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : आजचा दिवस हा रोहित शर्माचाच होता. पहिल्यांदा रोहित सलामीला आला आणि त्याने शतकाला गवसणी घातली. विक्रमही त्याने रचले. पण तब्बल दोन वर्ष रोहित कसोटी शतकाच्या प्रतिक्षेत होता. पण आता दोन वर्षांनी ही गोष्ट घडल्यावर रोहितने आपले मन मोकळे केले आहे. सामन्यानंतर आपली 'मन की बात' सांगितली आहे.
रोहितनं 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते. कसोटीत सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी शिखर धवनने 2012-13मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 187 धावांची खेळी केली होती. लोकेश राहुलने 2015मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावा केल्या होत्या, तर पृथ्वी शॉ याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 134 धावा केल्या आहेत.
रोहित म्हणाला की, " गेल्या दोन वर्षांपासून मी या गोष्टीची वाट पाहत होतो. अखेर दोन वर्षांनी हा योग जुळून आला. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये असताना मला सलामीला खेळायला मिळणार, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा या गोष्टीचा फायदा उचलण्याचे मी ठरवले होते. आजचा खेळही चांगला झाला. त्यामुळे आता यापुढे किती धावा वाढवता येतील, यावर आमचे लक्ष केंद्रीत असेल."
रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सॉलिड सुरुवात करताना दी वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. 1998मध्ये द्रविडनं केलेल्या विक्रमाची रोहितनं पुनरावृत्ती केली. येथेच तो थांबला नाही. त्यानं कसोटीत सलामीला येण्याच्या संधीचं सोनं करताना खणखणीत शतकही झळकावलं. रोहितनं घरच्या मैदानावर कसोटीत सलग सहावेळा 50+ धावा केल्या आहेत. त्यानं मागील सहा डावांत 82, 51*, 102*, 65, 50*, 59*( आजची खेळी) पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली. द्रविडनं 1997-98 या कालावधीत मायदेशात सलग सहावेळा 50+ धावा केल्या होत्या. या अर्धशतकामुळे रोहितचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि त्यानं त्याचं शतकात रुपांतर केले.