India vs South Africa 1st Test: न्यूझीलंडला घरच्या मैदानावर धूळ चारणाऱ्या भारतीय संघाची उद्यापासून (२६ डिसेंबर) आफ्रिकेच्या मैदानावर परीक्षा रंगणार आहे. भारताच्या संघात अनेक बड्या खेळाडूंचे पुनरागमन झाले असले तरी सलामीवीर रोहित शर्मा मात्र दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहलीला साथ देण्यासाठी लोकेश राहुलला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. राहुलने कालच एक पत्रकार परिषद घेत संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर आज भारताचा रणजी किंग वासिम जाफर याने पहिल्या कसोटीसाठी त्याच्या पसंतीचा भारतीय संघ निवडला.
सलामीवीर म्हणून विचार करता राहुलसोबत मयंक अग्रवाल हा उत्तम पर्याय असल्याचे जाफरने सुचवले. या दोघांपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहली यांनाही त्याने संघात स्थान दिले. पाचव्या क्रमांकासाठी संघात नक्की कोणाला स्थान द्यायचे, याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर जाफरने तोडगा काढला.
अजिंक्य रहाणेचा फॉर्म पाहता त्याने संघात खेळावे की नाही यावर खूप चर्चा झाली. नवख्या श्रेयस अय्यरला स्थान द्यावे की हनुमा विहारीला संघात घ्यावे यावरूनही काथ्याकूट झाली. पण अखेर जाफरने मुंबईकर अजिंक्य रहाणेलाच संघात स्थान दिले. अजिंक्य रहाणे आधीही आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. त्याला त्यांच्या खेळपट्ट्यांचा चांगलाच अंदाज आहे. त्यामुळे त्यालाच स्थान दिले जायला हवे, असं जाफर म्हणाला. तसेच, सहाव्या क्रमांकावर त्याने श्रेयस अय्यरलाही स्थान दिले.
रहाणे आणि अय्यर या दोघांनंतर यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा नंबर लावण्यात आला. पण अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने केवळ रविचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले. तर आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान माऱ्यासाठी उत्तम असल्याने त्याने भक्कम अशी गोलंदाजी निवडली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांसह त्याने मोहम्मद सिराजलाही संघात समाविष्ट केले. सिराजची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी पाहता त्याला अनेक खेळाडूंनी पसंती दर्शवली आहे.
वासिम जाफरने निवडलेला संघ - केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.