जोहान्सबर्ग- टीम इंडियाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये फलंदाज अजिंक्य रहाणेच्या वापसीचे संकेत दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटीमध्ये सततच्या दोन पराभवामुळे टीम इंडियावर टीकेचा भडीमार होतो आहे. संघनिवड प्रक्रिया चुकीची झाल्याने भारताला पराभवाचे धक्के बसत असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्याच्या संघनिवडीवर लक्ष लागलं आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संघाचा उपकर्णधार आणि परदेशात चांगल्या धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला वगळण्यात आलं होतं. त्याच्या जागी संघात स्थान दिलेल्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघ निवडताना रोहितच्या जागी अजिंक्यला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी टीम इंडियाने वॉन्डरर्स येथे सराव केला. यावेळी अजिंक्य रहाणे हा विराट कोहली व हार्दिक पांड्याबरोबर फलंदाजी करताना दिसला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेच्या संघात वापसीचे संकेत मिळत आहेत. फलंदाजी व क्षेत्ररक्षण संपल्यानंतर खूप वेळ विराट कोहली व रहाणे नेटमध्ये एकत्र थांबले होते.
अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझिलंडमध्ये भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण खेळाडू होता. फास्ट पिचवर रन्स करण्यासाठी रहाणे सक्षम आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यात अजिंक्यला संधी न देणं क्रिकेट चाहत्यांच्या समजण्याच्या पलीकडे होतं. सिरीजच्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये भारत आधी झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं दिसतं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतकं केलं होतं. त्याचबरोबर गेल्या मोसमात रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1200 धावा केल्या होत्या. त्याचा हा फॉर्म पाहता त्याला दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्थान देण्यात आलं. दुसरीकडे कसोटी सामन्यांमध्ये 54 ची सरासरी असताना अजिंक्यला वगळण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण हा निर्णय उलटला असून त्याचं रूपांतर पराभवात झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तरी भारतीय संघ व्यवस्थापन ही चूक करणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.