जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिस-या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघनिवड करताना पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 0-2 अशी गमावली आहे. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. विराटनं अंतिम 11 मध्ये दोन बदल केले आहेत. यामध्ये त्यानं पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहितला डच्चू देताना त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली आहे. त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाज अश्विनच्या जागी भुवनेश्वर कुमारला स्थान देण्यात आले आहे. भारतीय कसोटी संघात पाच वेगवाग गोलंदाजासह खेळण्याचा निर्णय विराट कोहलीनं घेतला. सहा वर्षानंतर हे पहिल्यांदाच असं घडलं आहे की संघात एकही फिरकी गोलंदाज नाही. यापूर्वी 2011-12ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना माजी कर्णधार एम.एस धोनीनं पर्थ कसोटीमध्ये भारतीय संघात एकही फिरकी गोलंदाज खेळवला नव्हता. यावेळी ऑस्ट्रेलियानं भारतावर एक डाव आणि 37 धावानी विजय मिळवला होता.
आज बुधवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहे. दोन्ही सलामिवीर के. एल राहुल (0) आणि मुरली विजय (8) बाद झाले आहेत. भारताच्या 17 धावा झाल्या असून कर्णधार विराट कोहली आणि पुजारा मैदानावर आहेत.
विराटच्या नावावर नकोसा विक्रम - कसोटी कर्णधार म्हणून विराटचा हा ३५वा सामना आहे. परंतु कोणत्याही दोन सलग सामन्यात विराट आजपर्यंत कधीही सारखाच संघ घेऊन मैदानात उतरलेला नाही. त्याने 35 कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या सामन्यात संघात एकतरी बदल केलेला आहे. यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने कसोटी कर्णधार झाल्यानंतर सलग 28 कसोटीत सलग दोन सामन्यात कधीही सारखाच संघ मैदानात उतरवला नव्हता. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये ग्रॅम स्मिथने तब्बल 44 सामन्यात संघात बदल केला होता.