जोहान्सबर्ग - खराब खेळपट्टीमुळे भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यातील तिस-या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ होणार की नाही याबाबत संभ्रम होता. खेळपट्टी पाहिल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे चौथ्या दिवसाचा खेळ सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यामुळे भारताला दोन सामन्यांमधील पराभवाचा वचपा काढण्याची पुरेपूर संधी मिळाली आहे. तिस-या दिवशी भारतीय संघ 247 धावांवर ऑल आऊट झाला होता. यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेने एक विकेट गमावत 17 धावा केल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 224 धावांची गरज आहे. तीन दिवसांचा खेळ पाहता फलंदाजांसमोर कडवं आव्हान आहे.
भारताने तिस-या कसोटीत तिस-या दिवसअखेर दुस-या डावात 247 पर्यंत आव्हाननात्मक मजल गाठून यजमान द. आफ्रिकेला 241 धावांचे विजयी लक्ष्य दिले आहे. पहिल्या दोन्ही कसोटीतून वगळण्यात आलेला शैलीदार फलंदाज आणि संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे संधी मिळताच मदतीला धावून आला. रहाणेच्या 48, कोहली 41, भुवनेश्वर कुमार 33 आणि मोहम्मद शमीच्या 27 धावांमळे भारताने दुसरा डाव 247 पर्यंत खेचला.
जोहान्सबर्गची खेळपट्टी खराब असल्याच्या कारणास्तव पंचांना अखेर तिस-या दिवशी खेळ थांबवावा लागला. या खेळपट्टीवर चेंडू धोकादायकपणे उसळी घेत असल्याचे मत माजी दिग्गजांनी नोंदविल्यानंतर पंचांना दखल घ्यावी लागली. उभय कर्णधार, सामनाधिकारी आणि मैदानी पंच यांच्यात सल्लामसलत सुरू झाली. दरम्यान द. आफ्रिकेच्या दुस-या डावात भुवनेश्वर कुमारचा चेंडू डीन एल्गरच्या हातावर लागल्याने तो जखमी होताच अखेरच्या सत्रात खेळ थांबविण्यात आला. सकाळच्या सत्रात खेळपट्टीवर चेंडू चांगलेच उसळी घेत होते. त्यामुळे फलंदाज चाचपडत होते. दरम्यान पंच अलीम दार आणि इयान गोल्ड यांनी खेळपट्टीचे अनेकदा निरीक्षण केले. कासिगो रबाडाच्या ३१ व्या षटकांत चेंडू कोहलीच्या डाव्या पायाला लागला. ३५ व्या षटकांत विजयच्या डाव्या हातावर चेंडू आदळला. यामुळे पंचांनी दोनदा उभय कर्णधारांसोबत संवाद साधला. याचवेळी समालोचन करणारे मायकेल होल्डिंग यांनी या खेळपट्टीला शंभरपैकी दोन गुण देत आयसीसीने खेळपट्टी ‘बॅन’ करावी, अशी सूचना केली. काही फलंदाजांसाठी ही खेळपट्टी कर्दनकाळ ठरू शकते. यावर गंभीर जखम होण्याची भीती व्यक्त करीत होल्डिंग यांनी सर्वच फलंदाजांकडे कोहलीसारखे धैर्य आणि तंत्र नसते, अशी कोपरखळी मारली. द. आफ्रिकेचा माजी कर्णधार केपलर वेसल्स आणि माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनीही खेळपट्टीच्या असमतोल स्वरुपावर कठोर शब्दात टीका केली आहे.
खेळपट्टी कठीण: अमला
द.आफ्रिकेचा फलंदाजीतील आधारस्तंभ हशीम अमला यानेही जोहान्सबर्गची खेळपट्टी फलंदाजीसाठी खडतर असून, यावर चेंडूचा अंदाज बांधणे कठीण होत असल्याचे सांगताच गांगुलीच्या आक्षेपाला बळ लाभले. अमला म्हणाला,‘माझ्या मते जोहान्सबर्गची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी सर्वात कठीण खेळपट्टी आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही इंग्लंडमध्ये खेळलो, तिकडेही अशाच स्वरूपाच्या खेळपट्ट्या होत्या. मात्र जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना आमची चांगलीच तारांबळ उडाली. अशाप्रकारच्या खेळपट्टीवर स्वत:ची विकेट वाचवीत धावा काढणे फारच आव्हानात्मक आणि धोकादायी आहे.’
Web Title: India vs South Africa 2018: The fourth day of the game in Johannesburg, the opportunity to take India away
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.