केपटाऊन - पाच जानेवारी रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही असं दिसतंय. सध्या दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश महत्वाच्या शहरांना दुष्काळ आणि पाणी टंचाईने ग्रासलं आहे. या कारणामुळे आफ्रिकेच्या संघाला फायदा होईल अशी खेळपट्टी बनवणं अवघड असल्याचं मैदानातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं या दुष्काळाचा भारतीय संघाला चांगलाच फायदा होणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेतील इतिहास बदलण्याची संधी चालून आली आहे.
केप टाऊनच्या मैदानाचे क्युरेटर इवन फ्लिंट यांनी ESPNcricinfo या वेबसाईटला दिलेल्या माहितीनूसार, पहिल्या कसोटीची खेळपट्टी ही आफ्रिकेच्या संघाला फायदेशीर ठरेल याची खात्री देता येणार नाही. फ्लिंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मैदानातले कर्मचारी पाणीटंचाईमुळे आठवड्यातून केवळ दोन वेळा मैदानावर पाणी मारु शकतायत, त्यामुळे केप टाऊनची खेळपट्टी हिरवीगार आणि स्टेन, मॉर्कल, फिलँडर यासारख्या गोलंदाजांना मदत करेल अशी राहणार नाही. येत्या दोन दिवसांमध्ये सकाळी पावसाची हलकी सर पडून नंतर प्रखर उन पडल्यास आम्ही कदाचीत नेहमीप्रमाणे खेळपट्टी तयार करु. मात्र या सर्व गोष्टी आपल्या हातात नसल्याचंही फ्लिंट यांनी मान्य केलं. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारतीय संघ आफ्रिकेच्या तोफखान्याचा कसा सामना करतो हे पहावं लागणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना एका दिवसाला 87 लिटरच्या वर पाणी वापरण्यास मनाई केली आहे. केप टाऊनच्या मैदानावर बोअरवेलच्या पाण्याची सोय आहे. केपटाऊनमधील पाणी समस्या इतकी गंभीर झाली आहे की, पाण्याचा स्तर अत्यंत खालावला आहे. ही खूप मोठी चिंतेची गोष्ट आहे.
स्थानिक निवासी निसियांनी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'पाण्याची कमतरता असताना केपटाऊनमध्ये दोन्ही संघांदरम्यान कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशावेळी इतर गोष्टींशी तुलना करता पाण्याची जास्त चिंता असली पाहिजे. पण खेळासाठी असं करणं कठीण आहे'. तेथीलच अजून एक नागरिक सब्बीर हर्नेकर यांनी लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी लोकांना आपल्यासोबत पाण्याच्या बाटल्या आणि कॅन घेऊन येण्याचा सल्ला दिला आहे. तेथीलच एका दांपत्याने पाण्याची समस्या इतकी मोठी आहे की, लांबून पाणी आणावं लागतं असं सांगितलं आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, केपटाऊनशी संबंधित एका अधिका-याची पिण्यायोग्य असणा-या पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या वापरावर नजर असते. येथे पाणी लेव्हल 6 वर पोहोचलं आहे. याचा अर्थ पाण्याचा वापर रोपटी, पूल आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकत नाही. जर एखाद्या नागरिकाने आदेशाचं पालन केलं नाही तर एक लिटर पाण्यासाठी जवळपास 51 हजारांचा दंड ठोठावण्यात येतो. एकीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भारतीय संघासाठी मात्र एक खुशखबर आहे. पाण्याच्या कमतरतेचा प्रभाव खेळपट्टीवर पहायला मिळणार आहे ज्याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.