केपटाऊन : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने केपटाउन कसोटीत अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी देण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव केला आहे. सामना सुरु होताना अजिंक्य रहाणेला वगळण्याच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण या निर्णयाची कोहलीने पाठराखण केली आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, पहिल्या कसोटीसाठी संघ निवडताना आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मचा विचार केला. श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेतही रोहित भन्नाट फॉर्ममध्ये होता. घरच्या मैदानावर तिनही प्रकारांमध्ये खेळताना रोहितने धावा केल्या होत्या. अशावेळी द्विधा मनःस्थिती असते, तुमचा निर्णय योग्य असेल किंवा नाही याचा तुम्ही विचार करत राहता. पण आम्ही विजयी संघासोबतच जाण्याचा निर्णय घेतला. संघ निवडताना आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मचा विचार केला असं स्पष्टीकरण कोहलीने दिलं आहे.
पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच रहाणेला 11 मध्ये संधी देण्यात यावी असे प्रत्येक दिग्गजाचे मत होते. पण सामन्यावेळी संघनिवड करताना विराट कोहली आणि रवी शात्रीने फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहित शर्माला संधी दिली. रोहित शर्मा दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. त्याला आपल्या दोन्ही डावामध्ये आपली उपयोगिता सिद्ध करता आली नाही. रहाणेची परदेशातील कामगिरी उल्लेखनीय आहे. घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या अजिंक्य रहाणेची आफ्रिकेतली कामगिरी मात्र चांगली आहे. वर्षभरापूर्वी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणे सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला होता. यावेळी चेतेश्वर पुजाराने 280 धावांसह पहिला क्रमांक, विराट कोहलीने 272 धावांसह दुसरा क्रमांक आणि अजिंक्य रहाणेने 209 धावांसह तिसरा क्रमांक पटकावला होता.
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतू भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Web Title: India vs South Africa 2018: Indian captain virat kohli disclose the reason why he dropped ajinkya rahane
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.