मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या कसोटीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर अवघ्या 286 धावांमध्येच आफ्रिकेचा अख्खा संघ गारद झाला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4 गडी बाद करत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. तर बुमराह, शमी, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. अश्विनने तळाच्या 2 फलंदाजांना बाद करत आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. शिवाय अश्विनने एका फलंदाजाला धावचीत केलं. आफ्रिकेच्या पहिल्या 3 विकेट अवघ्या 12 धावांमध्ये माघारी परतल्यामुळे यजमान संघाची अवस्था बिकट झाली होती. मात्र, यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि एबी डिव्हीलियर्सने संघाचा डाव सावरला. पण ही जोडी फुटल्यानंतर ठरावीक अंतराने आफ्रिकेचे खेळाडू बाद होत राहीले.
भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेची आघाडीची फळी भेदून काढली. भुवनेश्वर कुमार याने सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवरच सलामीवीर डेन एल्गरला शून्यावर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने अॅडिन मार्करम याला 5 धावांवर बाद केले. त्याने 11 चेंडूत 4 चौकारासह पाच धावा केल्या. भुवनेश्वरने त्याला पायचीत केले. त्यानंतर पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर खतरनाक हाशिम आमला याला 3 धावांवर बाद केले. मात्र यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि एबी डिव्हीलियर्सने संघाचा डाव सावरला. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी पहिल्या सत्रापर्यंत 95 धावांची नाबाद भागीदारी केली. अखेर ही जोडी फोडण्यात भारताला यश आलं. डिव्हीलियर्सला माघारी धाडून बुमराहने कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली.
भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा सुरू झाला आहे. स्थानिक मैदानावर सलग १२ कसोटी जिंकणा-या भारताला विदेशातही आम्ही ‘शेर’च आहोत, हे सिद्ध करण्याचे आव्हान असेल.
2018-19च्या कडव्या मोसमाची सुरुवात द. आफ्रिकेविरुद्ध तीन कसोट्यांद्वारे होत आहे. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा असेल. हे सत्र कर्णधार विराट कोहली आणि सहका-यांसाठी महत्त्वाचे आहे. ‘घरचे शेर विदेशात ढेर’ हा समज चुकीचा ठरवून कामगिरी सुधारण्यासाठी झुंज द्यावी लागेल. भारताचे यश वेगवान मा-यावर ब-याच अंशी विसंबून आहे. रँकिंगमध्ये भारताने द. आफ्रिकेवर वर्चस्व गाजविले आहे. संघाने 0-3 ने मालिका गमावली, तरीही हे स्थान अबाधित राहील. कोहलीच्या संघासाठी मात्र केवळ आकडे आणि रँकिंग महत्त्वाचे नाही.
यजमान द. आफ्रिका संघ भारताचा बलाढ्य फलंदाजी क्रम कोसळविण्यास सज्ज आहे. त्यासाठी वेगवान मारा तयार ठेवण्यात आला असून, भारतीय संघाने हे आव्हान परतविण्यास कंबर कसली आहे. मागील दोन दौºयांत भारताने आफ्रिकेत चांगली कामगिरी केली. २०१०मध्ये मालिका बरोबरीत सोडविली, तर २०१३-१४मध्ये कडव्या संघर्षात भारताचा पराभव झाला. त्या संघातील १३ खेळाडू सध्याच्या संघात आहेत. या सर्वांना मोठा अनुभव असून, अनेक विजयांत त्यांनी योगदान दिले आहे.
(फोटो - बीसीसीआय)