केपटाऊन - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या रुपाने सकाळच्या सत्रात भारताला चौथा धक्का बसला. रबाडाने (11) धावांवर रोहितला पायचीत पकडले. आता आर अश्विन आणि चेतेश्वर पूजाराची जोडी मैदानावर आहे. कालच्या तीन बाद 28 वरुन डाव पुढे सुरु करताना भारताने अत्यंत सावध फलंदाजी केली. सकाळच्या सत्रात 29 धावांची भर घातल्यानंतर भारताला पहिला झटका बसला.
मुरली विजय, शिखर धवन आणि विराट कोहली हे आघाडीचे भारतीय फलंदाज तंबूत परतले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला 286 धावांवर रोखले होते. भारतीय संघ अजूनही 258 धावांनी पिछाडीवर आहे. दुस-या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ महत्वाचा असून दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी भारतीय फलंदाजांना घ्यावी लागेल. खरंतर भारतीय संघाला आज कसोटीवर वर्चस्व मिळवण्याची संधी आहे पण दक्षिण आफ्रिकेच्या आग ओकणा-या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.
धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शिखर धवनने ३ खणखणीत चौकार मारत यजमानांना धोक्याचा इशारा दिला. मात्र, वेर्नोन फिलँडर याने ५व्या षटकात भारतीयांना मोठा झटका देत मुरली विजयला डीन एल्गरकरवी झेलबाद केले. विजय १७ चेंडूंमध्ये केवळ एक धाव काढून तंबूत परतला. यानंतर, धवन एक बाजू टिकवून ठेवेल अशी अपेक्षा होती. परंतु, डेल स्टेनच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर आक्रमक फटक्याच्या नादात तो झेलबाद झाला. स्टेननेच त्याचा झेल घेत त्याला माघारी धाडले. यानंतर कर्णधार विराट कोहलीला केवळ ५ धावांत बाद करत मॉर्नी मॉर्केलने भारताची दिवसअखेर ११ षटकात ३ बाद २८ धावा अशी अवस्था केली होती.
भुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. फिरकीपटू रविचंद्रन आश्विननेही २१ धावांत २ बळी घेत भुवीला चांगली साथ दिली. त्याचवेळी, एबी डिव्हिलियर्स (६५) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (६२) यांच्या अर्धशतकामुळे यजमानांनी समाधानकारक मजल मारली.