India vs South Africa 2nd ODI: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी पाठोपाठ वन डे मालिकाही गमावली. भारताचा दुसऱ्या वन डे मध्ये सात गडी राखून पराभव झाला. धडाकेबाज ऋषभ पंत (८५) आणि कर्णधार केएल राहुल (५५) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २८७ धावांपर्यंत मजल मारली होती. पण आफ्रिकन सलामीवीर जानेमन मलान (९१) आणि क्विंटन डी कॉक (७८) यांच्या फटकेबाज सलामीने सामना भारतापासून खूपच दूर नेला. आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकत वन डे मालिका जिंकली. भारतावर एकाच दौऱ्यावर कसोटीनंतर वन डे मालिकाही गमावण्याची वेळ आली. हे दु:ख खेळाडूंच्या मनात असताना आफ्रिकन कर्णधाराने टीम इंडियाच्या जखमेवर आणखी मीठ चोळलं.
भारतीय संघात अनेक बडे खेळाडू आहेत. पण तरीही भारताच्या संघाला पराभूत व्हावं लागले. त्यावरून आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमाने एक विधान केलं. सामना संपल्यानंतर पोस्ट मॅच प्रेंझेंटेशनमध्ये बोलताना बवुमा म्हणाला, "आम्ही शेवटचा सामनादेखील जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करू. कारण आमच्या संघातील सर्वच खेळाडू सांघिक भावनेने खेळतात. आम्ही स्टार खेळाडू किंवा एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची चूक करत नाही." टेंबा बावुमाचं हे विधान एका अर्थी टीम इंडियाला बोचणारंच होतं.
बावुमा पुढे म्हणाला, "जेव्हा आम्ही वन डे मालिका खेळायला सुरूवात केली तेव्हा कोणालाही अपेक्षा नव्हती की आम्ही मालिका जिंकू. आम्ही मालिका खेळलो तेव्हा आमचा प्रयत्न मालिका विजयाचाच होता, पण पहिल्या दोन सामन्यातच आम्ही मालिका सहजपणे जिंकू असं आम्हाला वाटलं नव्हतं. पण आता आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. दुसरा सामना जिंकल्यानंतर आता आम्ही मालिका ३-०ने जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. २-१ ही देखील चांगली आघाडी आहे. पण भारतासारख्या तगड्या संघाला व्हाईटवॉश देणं हे आमच्या संघासाठी खूपच सकारात्मक गोष्ट ठरेल", असंही बावुमा म्हणाला.