मोहाली : धर्मशाला येथे पहिली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ बुधवारी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे.
पुढील वर्षी होणाºया टी२० विश्वकप स्पर्धेसाठी अद्याप १२ महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे, पण कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच यासाठी विस्तृत योजना तयार केली असून संघात असलेल्या युवा खेळाडूंकडून काय अपेक्षित आहे, हे स्पष्ट केले आहे.
धर्मशाळामध्ये पहिल्या लढतीत एकही चेंडू टाकला गेला नाही, पण मैदानाबाहेरच्या घटनांमध्ये पंत केंद्रबिंदू ठरला. संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, या यष्टिरक्षक फलंदाजाला आपल्या चुकांची पुनरावृत्ती करता येणार नाही. जर त्याने तसे केले तर त्याला त्याचे फळ भोगावे लागेल. कोहलीने अद्याप संघात महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाचा पर्याय खुला ठेवला असून पंतवर लौकिकाला साजेशी कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. पंत व्यतिरिक्त लेग स्पिनर राहुल चाहर व वाशिंग्टन सुंदर यांच्यावरही दडपण राहील. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताला २० पेक्षा अधिक सामने खेळायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ फलंदाजी मजबूत करण्यास प्रयत्नशील आहे. त्यासाठी आठव्या, नवव्या व १० व्या क्रमांकाच्या फलंदाजांना नियमितपणे अधिक धावा फटकवाव्या लागतील.
श्रेयस अय्यर व मनीष पांडे यांच्यासाठीही ही मालिका महत्त्वाची आहे. मधली फळी मजबूत करण्यासाठी त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. शिखर धवनकडेही मोठी खेळी करण्याची संधी आहे. येथील मैदान धवनसाठी लकी आहे. या मैदानावर त्याने कसोटी पदार्पणात १८७ धावांची खेळी केली होती तर गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १४३ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकासाठी भारताला पराभूत करणे सोपे नाही. भारतीय संघ अलीकडच्या कालावधीत शानदार फॉर्मात आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या नेतृत्वाखाली द. आफ्रिका संघाचे गोलंदाजी आक्रमणाला भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी विशेषत: विराट कोहलीला शानदार गोलंदाजी करावी लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे,
रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.
दक्षिण अफ्रीका : क्विंटन डिकाक (कर्णधार), रेसी वान डेर दुसेन, तेंबा बावुमा, ज्युनियर डाला, ब्योर्न फोर्टिन, ब्युरेन हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, एनरिच नोर्तजे, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबादा, तबरेज शम्सी आणि जॉर्ज लिंडे.
Web Title: India vs South Africa, 2nd T-20: India's goal of leading the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.