मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा सलामीवीर शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात 40 धावांची दमदार खेळी साकारली. पण या सामन्यात धवनने एक जोरदार फटका लगावला. आता हा फटका चौकार जाईल, असे धवनला वाटले होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने अप्रतिम झेल पकडला आणि धवनला बाद होऊन माघारी परतावे लागले.
याबद्दल धवन म्हणाला की, " जेव्हा मी हा फटका मारला तेव्हा मला वाटले की आता चौकार मिळणार. पम मिलरने अफलातून झेल पकडला. हा झेल पकडलेला पाहून फक्त मलाच नाही तर कर्णधार विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले."
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सात विकेट्स राखत सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना भारता रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला, रोहितला 12 धावा करता आल्या. रोहित बाद झाल्यावर कोहली आणि धवन यांची चांगलीच जोडी जमली. धवनने 40 धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. पण धवन बाद झाल्यावर रिषभ पंतही चार धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.कर्णधार क्विंटन डीकॉक आणि तेंदा बवुमा यांच्या दमदार खेळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या दोघांच्या दमदार खेळींमुळेच दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले.
भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. क्विंटन डीकॉकने सुरुवातीपासूनच जोरदार हल्ला भारताच्या गोलंदाजीवर चढवला. क्विंटन डीकॉकने 37 चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर 52 धावांची खेळी साकारली. क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर पदार्पण करणाऱ्या बवुमाने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बवुमाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 49 धावा केल्या.