मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : मोहाली येथे काही मिनिटांमध्ये दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्यातरी सामन्यावर पावसाचे सावट दिसत नाही. पण मोहालीची खेळपट्टी असेल तरी कशी, याबाबत भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मोहालीच्या खेळपट्टीबाबत गावस्कर म्हणाले की, " खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येईल. पण जसा चेंडू जुना होत जाईल तसा तो बॅटवर थोड्या उशिराने येईल. खेळपट्टीवर काही काळे डाग आहेत, त्यामुळे कालांतराने चेंडू संथगतीने येईल."
दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात पाऊस कधी पडणार, जाणून घ्या...भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा ट्वेन्टी-20 सामना रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.
दोन्ही संघ या सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे. उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत.
मोहाली येथील सामना सुरु झाल्यावर अर्ध्या किंवा एका तासाने पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाची शक्यता फक्त 5 ते 10 टक्के वर्तवण्यात आली आहे. सामना सुरु झाल्यावर अर्ध्या तासामध्ये पावसाचे आगमन होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण हा पाऊस जोरदार नसेल, त्याचबरोबर जास्त वेळ पावसामुळे वाया जाणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता पाऊस बाजी मारणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.