चंदिगड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : उभय संघातील पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. आज चंदिगड येथे दुसरा ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार आहे आणि या सामन्यापासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात विक्रमासाठी चढाओढ सुरू होणार आहे.
उभय देशांमध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. भारताने 13पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेला 5 सामने जिंकता आले आहेत. पण, युवा खेळाडूंसह टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष असेल ते कोहली व रोहितच्या कामगिरीवर. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर या दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार कोहलीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. रोहित 53 धावांच्या आघाडीसह अव्वल स्थानावर आहे. कोहलीला या विक्रमात रोहितला मागे टाकण्याची संधी आहे. रोहितनं 88 डावांत 2422 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावे 65 डावांत 2369 धावा आहेत. दुसरीकडे रोहितला कोहलीच्या एका विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या विक्रमात कोहली 21 अर्धशतकांसह आघाडीवर आहे. रोहितच्या नावावर 17 अर्धशतकं आणि चार शतकं आहेत.
संभाव्य संघ भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.