IND vs SA 2nd T20 Weather Report: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना सेंट जॉर्ज पार्क येथे होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा संघ कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण, या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आणि आता भारतीय संघाकडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी केवळ ५ मॅच उरल्या आहेत आणि त्यापैकी आजच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहेच. त्यामुळे वर्ल्ड कपच्या तयारीवर लक्ष ठेवावे की पावसाकडे असे कन्फ्युजन टीम इंडियात दिसतेय.
भारतीय संघ दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी काल सेंट जॉर्ज पार्क येथे दाखल झाला. दुसऱ्या सामन्यातही पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. सामन्यातील ७० टक्के वेळ पावसामुळे वाया जाण्याचा अंदाज आहे. येथील तापमान सुमारे २१ अंश सेल्सिअस, आर्द्रता पातळी अंदाजे ७५ टक्के आणि वाऱ्याचा वेग सुमारे ३५ किमी प्रतितास असण्याचा अंदाज आहे. जून २०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी फक्त पाच खेळ शिल्लक आहेत आणि खेळाडूंना संधी देण्यासाठी व्यवस्थापनाकडे खूप कमी सामने आहेत. त्यामुळे आयपीएलमधील कामगिरी वर्ल्ड कपसाठी ग्राह्य धरली जाणार असे सध्यातरी दिसतेय.