Join us  

India vs South Africa, 2nd Test : चाहत्यांसाठी बॅड न्यूज; दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट

पावसाच्या व्यत्ययानंतर किती षटकांचा सामना खेळवला जातो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 6:20 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात भारत विजय मिळवणार की नाही, याबाबत चाहत्यांच्या मनामध्ये साशंकता आहे.

भारताचा दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे. पण या आठवड्यामध्ये पावसाची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. यावेळी तापमान 21 ते 31 डीग्री एवढे असेल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे आता पावसाच्या व्यत्ययानंतर किती षटकांचा सामना खेळवला जातो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

भारताने पहिल्या कसोटीत आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मानं कसोटीत प्रथम सलामीला येताना दोन्ही डावात शतकी खेळी करून इतिहास घडवला. त्याच्या या खेळीला मयांक अग्रवाल, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांची उत्तम साथ लाभली. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं उद्याच्या सामन्यात अंतिम अकरा शिलेदार कोण असतील, याचे संकेत दिले आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी सलामीवीर म्हणून रोहित शर्माच टीम इंडियाची पहिली पसंती असेल, तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनाच या कसोटीत संघात स्थान मिळेल, असे स्पष्ट संकेत कोहलीने दिले. अश्विन आणि जडेजा यांनी पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी केली. जडेजानं सहा विकेट्स घेतल्या शिवाय ( 46 चेंडूंत 30 धावा आणि 32 चेंडूंत 40 धावा) 70 धावाही केल्या. 2019मध्ये पहिलीच कसोटी खेळणाऱ्या अश्विननं 189 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. त्यात पहिल्या डावातील 7 विकेट्सचा समावेश आहे.

कोहली म्हणाला,''अश्विन आणि जडेजा हेच दुसऱ्या कसोटीसाठी पहिली पसंती असतील. या दोघांनी गोलंदाजी आणि फलंदाजीतही योगदान दिलेलं आहे. संतुलित संघ निवडण्यावर आमचा भर असेल.''  या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या कसोटी संघात कुलदीप यादवचाही अंतिम 15 मध्ये समावेश आहे. पण, त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. रोहित आणि हनुमा विहारी हे अतिरिक्स फिरकी गोलंदाजी करणारे खेळाडूही संघात आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आलेली नाही. आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात कुलदपने चांगली कामिगिरी केली होती. पण तरीही त्याला या मालिकेत संधी देण्यात आली नाही, याबद्दल बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण कुलदीपला संघात स्थान का देण्यात आलेले नाही, याबाबतचे स्पष्टीकरण भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.

कोहली म्हणाला की, " कुलदीपने सिडनी कसोटीमध्ये पाच बळी मिळवले होते, पण त्यानंतरही भारतातील कसोटी मालिकेत त्याला का संधी देण्यात आली नाही, असा प्रश्न काही जणांना पडला आहे. पण संघ निवडत असताना आम्ही काही गोष्टी नक्की पाहतो. भारतामध्ये खेळताना आम्ही रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनाच नेहमी पसंती देतो."

कुलदीपपेक्षा अश्विन आणि जडेजा यांनाच का संधी दिली जाते, असे विचारल्यावर कोहली म्हणाला की, " भारतामध्ये खेळताना आम्ही काही गोष्टींचा विचार नक्कीच करतो. भारतामध्ये खेळताना आम्ही गोलंदाज किती धावा करू शकतो, याचाही विचार करतो. जडेजा आणि अश्विन हे उपयुक्त फलंदाजीही करतात, त्यामुळेच त्यांना भारतामध्ये खेळताना आम्ही पसंती देतो."

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकापुणे