पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला. मयांक अगरवालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 273 अशी मजल मारली आहे.
अंधुक प्रकाशामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा 85.1 षटकांचा खेळ झाला होता. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहली 63 आणि अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत आहेत.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी भारताला अश्वासक सुरुवात करता आली नाही. कारण गेल्या सामन्यात दोन शतके झळकावणारा रोहित शर्मा यावेळी 14 धावांवर बाद झाला. सामन्याच्या दहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रबाडानं रोहितला माघारी पाठवले. पहिल्या कसोटीत एकूण 303 धावा करणारा रोहित आज अवघ्या 14 धावांत माघारी परतला. पण, त्यानंतर आफ्रिकेला दुसऱ्या विकेटसाठी 163 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. मयांक आणि चेतेश्वर या दोघांनाही आफ्रिकन क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिले. रबाडाच्याच गोलंदाजीवर चेतेश्वर शून्यावर असताना झेल सुटला. त्यानंतर या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. चेतेश्वर 112 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचून 58 धावांत माघारी परतला. रबाडानं त्याला बाद केले.
दुसऱ्या कसोटीत मयांकने 195 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 108 धावा केल्या. पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी 2009-10मध्ये विरेंद्र सेहवागनं 2009-10 च्या मालिकेत आफ्रिकेविरुद्ध 109 आणि 165 धावांची खेळी केली होती. शिवाय आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन ( 1996), विरेंद्र सेहवाग ( 2010), सचिन तेंडुलकर ( 2010) यांनी अशी कामगिरी केली आहे.
मयांक बाद झाल्यावर कोहली आणि रहाणे यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी संयतपणे खेळत करत हा दिवस खेळून काढण्याचे काम चोख बजावले. रहाणेने 10 चौकारांच्या जोरावर नाबाद 63 धावांची खेळी साकारली, तर रहाणेने 3 चौकारांच्या जोरावर नाबाद 18 धावा केल्या.
Web Title: India vs South Africa, 2nd Test: Due to bad light, day game stopped, India is 273 for 3
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.