भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली आणि भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या एका सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं भारताच्या दिग्गजांना मागे टाकले.
मयांक अग्रवाल ( 108), विराट कोहली ( 254*), चेतेश्वर पुजारा ( 58), अजिंक्य रहाणे ( 59) आणि रवींद्र जडेजा ( 91) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 4/69), उमेश यादव ( 3/37) आणि मोहम्मद शमी ( 2/44) यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गडगडला. कर्णधार कोहलीनं चौथ्या दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेचा संघ 189 धावांत तंबूत परतला. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
कर्णधार म्हणून कोहलीचा 50वा सामना होता. कर्णधार म्हणून पहिल्या पन्नास सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहलीनं तिसरे स्थान पटकावले आहे. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ ( 37 विजय) आणि रिकी पाँटिंग ( 35) अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. कोहलीनं 50 सामन्यांत 30 विजय मिळवले आहेत. या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या कोहलीला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीनं चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
सचिन तेंडुलकर ( 14), राहुल द्रविड ( 11) आणि अनिल कुंबळे ( 10) अव्वल तीन स्थानी आहेत. कोहलीचा हा 9वा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार ठरला. कपिल देव व वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी 8 वेळा हा मान पटकावला आहे. कर्णधार म्हणून आफ्रिकेविरुद्ध मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा कोहली हा
सचिन तेंडुलकर ( 2000) याच्यानंतर पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं आठव्यांदा डावानं विजय मिळवला आहे. या कामगिरीसह कोहलीनं माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यानं सौरव गांगुलीचा विक्रम मोडताना संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनी 9 विजयासह अव्वल स्थानी आहे.
Web Title: India vs South Africa, 2nd Test : Eight innings wins for India under Virat Kohli; third in most wins in first 50 Tests as a captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.