मैसूर : भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जमके धुलाई केली. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील दुसरा चार दिवसीय सामना मैसूर येथे सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारत अ संघाने विजय मिळवला आहे आणि दुसऱ्या सामन्यातही भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला आहे. भारत अ संघाने पहिल्या डावात 417 धावा चोपून काढल्या. शुबमन गिल, करूण नायर, वृद्धीमान साह, शिवम दुबे आणि जलाज सक्सेनाच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने ही मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात निवड झालेल्या गिलनं कामगिरीतील सातत्य कायम राखले. त्यानं 137 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकारासह 92 धावा केल्या. करुण नायरनं त्याला तिसऱ्या विकेटसाठी उत्तम साथ दिली. गिल व नायर यांनी 135 धावांची भागीदारी केली. गिल माघारी परतल्यानंतर नायर व साह यांनी संघाची धावसंख्या वाढवली. नायरने 168 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 78 धावा केल्या. साहनं एकाबाजूनं संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. त्यानं 126 चेंडूंत 8 चौकारांसह 60 धावा केल्या. मुंबईकर शिवम दुबेनं 84 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारांसह 68 धावा केल्या. जलाज सक्सेनाने अखेरपर्यंत खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. सक्सेना 105 चेंडूंत 3 चौकारांसह 48 धावांवर नाबाद राहिला.
गिल अन् सहानं वाढवलं रोहित-पंतचं टेंशन?
शुबमन गिलनं भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना सलग दुसऱ्या सामन्यात 90 धावांची खेळी केली. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात लोकेश राहुलच्या जागी त्याची निवड करण्यात आली आहे. पण, रोहित शर्माला सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तरीही सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर गिल निवड समितीला फेरविचार करण्यास भाग पाडू शकतो. त्यात तो यशस्वी झाल्यास रोहितचे कसोटीत सलामीला येण्याचे स्वप्न भंगू शकते. दुसरीकडे यष्टिरक्षक पंतवरही मोठी खेळी करण्याचे दडपण आहे. अशात साहची कामगिरी त्याचं टेंशन वाढवणारी ठरू शकते. साहनेही दुखापतीतून सावरत टीम इंडियात स्थान पटकावले आहे.
Web Title: India A vs South Africa A 2nd Test : India A all out at 417 runs in first innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.