पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघ सध्या दुसरा सामना पुण्यामध्ये खेळत आहेत. यानंतर होणारा तिसरा कसोटी सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना रांची येथे होणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानात धोनीला सहभागी करण्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
भारताने पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ विजय मिळवण्याच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. पण मग धोनी तिसऱ्या सामन्यात कसा सहभागी होऊ शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण घरच्या सामन्यात त्याला संधी द्यावी, असेही तुम्हाला वाटत असेल. जर रांचीला एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-20 सामना झाला असता तर कदाचित धोनी तुम्हाला मैदानात दिसू शकला असता.
धोनीला या सामन्यात सहभागी होण्यासाठी रांची क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षांनीही विनंती केली आहे. उपाध्यक्ष अजय नाथ यांनी सांगितले की, " आमच्यासाठी या सामन्यात धोनीचा सहभाग फार महत्वाचा आहे. हा सामना त्याने येऊन पाहावा, असे आम्हा साऱ्यांना वाटते. त्यामुळे या सामन्याला त्याने उपस्थिती लावावी, अशी विनंती आम्ही केली आहे. पण धोनीने याबाबत आपले उत्तर दिलेले नाही."
अजय नाथ यांनी जरी धोनीच्या सहभागाबाबत काही सांगितले नसले तरी 'दी टेलीग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार धोनी या सामन्याला हजेरी लावणार असल्याचे समजत आहे.