पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दुसऱ्या कसोटी सामन्यातही शतक साकारले. पहिल्या कसोटी त्याने द्विशतक झळकावले होते, दुसऱ्या कसोटीतही त्याने आपला फॉर्म कायम राखला आहे. पण मयांक फक्त पहिल्या डावांमध्ये जास्त धावा करत असल्याचे पाहायला मिळाले आहे, तर दुसऱ्या डावात मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसत आहे. हे दाखवणारी आकडेवारीही समोर आली आहे.
मयांकने आतापर्यंतच्या सहा कसोटी सामन्यांच्या पहिल्या डावांमध्ये अनुक्रमे 76, 77, 5, 55, 215 नाबाद 50 आणि 108 धावा केल्या आहेत. पण दुसऱ्या डावात मात्र मयांकला एकही अर्धशतक पूर्ण करता आलेले नाही. मयांकने आतापर्यंत सहा कसोटी सामन्यांच्या दुसऱ्या डावात अनुक्रमे 42 , 16, 4 आणि 7 धावा केल्या आहेत. त्यामुळे मयांक पहिल्या डावाचा हिरो असला तरी दुसऱ्या डावात मात्र तो फ्लॉप ठरताना दिसत आहे.
दुसऱ्या कसोटीत मयांकने 188 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 105 धावा केल्या. पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी 2009-10मध्ये विरेंद्र सेहवागनं 2009-10 च्या मालिकेत आफ्रिकेविरुद्ध 109 आणि 165 धावांची खेळी केली होती. शिवाय आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन ( 1996), विरेंद्र सेहवाग ( 2010), सचिन तेंडुलकर ( 2010) यांनी अशी कामगिरी केली आहे.
सामन्याच्या दहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रबाडानं रोहितला माघारी पाठवले. पहिल्या कसोटीत एकूण 303 धावा करणारा रोहित आज अवघ्या 14 धावांत माघारी परतला. पण, त्यानंतर आफ्रिकेला दुसऱ्या विकेटसाठी 163 धावांपर्यंत वाट पाहावी लागली. मयांक आणि चेतेश्वर या दोघांनाही आफ्रिकन क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिले. रबाडाच्याच गोलंदाजीवर चेतेश्वर शून्यावर असताना झेल सुटला. त्यानंतर या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. चेतेश्वर 112 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचून 58 धावांत माघारी परतला. रबाडानं त्याला बाद केले.