भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताला अवघ्या 25 धावांवर पहिला धक्का बसला. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा ( 14) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला. पुजाराला शून्यावर असताना जीवदान मिळाले, तर मयांकला आफ्रिकन गोलंदाजाच्या खतरनाक बाऊन्सरचा सामना करावा लागला. हा बाऊन्सर इतका वेगवान होता की मयांकला हेल्मेट बदलावे लागले.
दुसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांत एकेक बदल पाहायला मिळाला. भारताने हनुमा विहारीच्या जागी उमेश यादवला संधी दिली. भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. दुसरीकडे आफ्रिकेनंही तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी डेन पिएडला बाकावर बसवले अन् अॅनरिच नोर्त्जेला पदार्पणाची संधी दिली. आफ्रिकेकडून कसोटीत पदार्पण करणारा तो 337वा खेळाडू ठरला.
नोर्त्जेनं सातत्यानं 145+ च्या वेगानं मारा करताना भारतीय फलंदाजांवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. डावाच्या 11व्या षटकात त्यानं टाकलेला बाऊन्सर मयांकला खडबडवणारा ठरला. त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला. मयांकने त्वरित हेल्मेट काढून त्याची पाहणी केली आणि नवीन हेल्मेट आणण्यास सांगितले.
पाहा व्हिडीओ...
विराट कोहलीचं अर्धशतक; गांगुलीचा विक्रम मोडलाया कसोटीत मैदानावर उतरताच कर्णधार विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा पन्नासावा सामना ठरला आहे. त्यानं या कामगिरीसह माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 49 सामन्यांचा विक्रम मोडला. या विक्रमात महेंद्रसिंग धोनी 60 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. धोनीनं 60 सामन्यांत 27 विजय मिळवले आहेत. कोहलीनं 49 सामन्यांपैकी 29 विजय मिळवून धोनीला मागे टाकले आहे.